Ad will apear here
Next
आधुनिक प्रसारमाध्यमांचा वापर केल्यास वाचनसंस्कृतीला धोका नाही
लेखक-प्रकाशक संमेलनातील परिसंवादातील सूर
‘पुस्तक विक्रीच्या नव्या वाटा आणि नव्या दिशा’ या विषयावरील परिसंवादात बोलताना नाशिकचे विलास पोतदार. शेजारी विनायक रानडे, अमृता कुलकर्णी, घनश्याम पाटील आणि चेतन कोळी.

चिपळूण :
‘आधुनिक प्रसारमाध्यमांचा योग्य तो उपयोग करून घेतला, तर प्रकाशन व्यवसाय आणि मराठी वाचन संस्कृतीला कोणताही धोका नाही,’ असा सूर चिपळूणमध्ये भरलेल्या दुसऱ्या लेखक-प्रकाशक साहित्य संमेलनातील परिसंवादात निघाला.

चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर, महाराष्ट्र साहित्य परिषदेची चिपळूण शाखा आणि अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्फे दोन दिवसांचे लेखक-प्रकाशक साहित्य संमेलन नुकतेच पार पडले. त्यामध्ये पहिल्या दिवशीच्या (२८ डिसेंबर २०१९) दुसऱ्या टप्प्यातील सत्रात ‘पुस्तक विक्रीच्या नव्या वाटा आणि नव्या दिशा’ या विषयावर परिसंवाद झाला. मनीषा दामले यांनी सूत्रसंचालन केलेल्या या परिसंवादात घनश्याम पाटील (चपराक प्रकाशन), अमृता कुलकर्णी (कॉन्टिनेन्टल, पुणे), चेतन कोळी (पुणे), विलास पोतदार आणि विनायक रानडे (नाशिक) यांनी सहभाग घेतला. 

घनश्याम पाटील म्हणाले, ‘वाचनसंस्कृती कमी झालेली नाही. तिचा केंद्रबिंदू बदललेला आहे. तो शहरातून ग्रामीण भागाकडे वळला आहे. तोच प्रकाशकांनी लक्षात घेतला नसल्यामुळे वाचनसंस्कृती धोक्यात आल्याचे सांगितले जाते; पण चपराक प्रकाशनतर्फे विविध उपक्रम राबविताना दररोज एक याप्रमाणे वर्षभरात ३६५ पुस्तकांचे प्रकाशन केले जात आहे. १९५० ते १९८० या काळात वाचकांना मनोरंजनाची इतर साधने नव्हती. त्यामुळे ते वाचनामध्ये मग्न होते; पण त्यानंतर तंत्रज्ञानाचा प्रसार वाढला. त्याचा अवलंब नवे वाचक करू लागले; मात्र त्याहीपलीकडे जाऊन आणखी नवा वाचक तयार झाला पाहिजे, यासाठी प्रयत्न होत नाहीत. मंत्री, अभिनेते अशा मान्यवरांच्या घरांमध्ये असलेल्या वेगवेगळ्या सुविधांच्या बातम्या होतात; पण त्यांच्या घरात पुस्तकाची कपाटे आहेत का, याची कोठेही चर्चा होत नाही, बातमी होत नाही. या स्थितीमध्ये प्रकाशक, लेखक, वितरक आणि वाचकही दोषी आहेत, असे म्हणता येईल. चांगली पुस्तके वाचकांपर्यंत नेण्यासाठी, नवे लेखक तयार करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. शंभर वर्षांपासून साहित्य संमेलनांमध्ये ‘मराठी भाषा लोप पावणार का,’ अशा आशयाचे परिसंवाद घेतले जातात. त्याला अनेक कारणे आहेत. त्याच त्या लेखकांची पुस्तके लोकांनी किती दिवस वाचायची हा प्रश्न आहे. खरे साहित्यिक मागे राहतात आणि चमकोगिरी करणारे पुढे येतात. ही परिस्थिती बदलण्यासाठी नकारात्मकता बाजूला ठेवून चांगला वाचक तयार करण्यासाठी प्रकाशकांनी प्रयत्न करायला हवेत.’

अमृता कुलकर्णी म्हणाल्या, ‘प्रकाशक आणि पुस्तकांचे वितरक यांच्यामध्ये संवाद निर्माण झाला पाहिजे. प्रदर्शनांना प्रतिसाद मिळत नाही, म्हणून अनेक प्रदर्शने बंद केली जात आहेत; पण वाचक त्याकडे का फिरकत नाही, याचा विचार करायला हवा. कारण वाचक सतर्क आहेत. त्यांच्यापर्यंत वितरक आणि प्रकाशकांनीही पोहोचले पाहिजे. नव्या प्रसारमाध्यमांचा पुस्तक व्यवसायाला फटका बसला, असे सांगितले जात असले, तरी निर्मिती उत्तम असेल तर त्याला वाचक नक्कीच मिळतो. वेबसाइटचा उत्तम वापर, डिजिटल स्लाइड शोद्वारे प्रसार, माहिती तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर केला तर वाचन संस्कृती नक्कीच वाढीला लागेल.’

इंजिनीअरिंग क्षेत्र आणि नोकरी सोडून प्रकाशन व्यवसायात पदार्पण केलेले चेतन कोळी यांनी, जे छापले जाते ते वाचले जाते की नाही, याची पाहणी करायला हवी, असे सुचविले. ‘उत्तम विषय, चांगला आशय आणि सुंदर मांडणी असेल तर पुस्तक विकले जायला कोणतीही अडचण नाही. एखाद्या विषयावरचे पुस्तक प्रसिद्ध करताना त्याच विषयाची किती पुस्तके आतापर्यंत झाली आहेत, याचे सर्वेक्षण केले पाहिजे. असे कुठल्याही तऱ्हेचे सर्वेक्षण न करता विचाराविना पुस्तक छापले गेले तर लेखकांची हौस होते; पण त्यांची विक्री होत नाही. त्याला वाचक मिळत नाहीत. वाचकांची गरज कोणती आहे, हे लक्षात घ्यायला हवे. मागणी तसा पुरवठा हे तत्त्व या ठिकाणीही अमलात आणले पाहिजे. शहरे, तालुके आणि गाव पातळीवर दुवा साधला गेला पाहिजे. पारंपरिक पद्धतीने विक्री करून चालणार नाही. बाजारातील ट्रेंड लक्षात घ्यायला हवेत. साहित्यमूल्य आणि बाजारमूल्य यांची सांगड घालणे ही ही प्रकाशकाची जबाबदारी आहे. ती त्यांनी पार पाडली तर विक्री चांगली होऊ शकते. परभणीतील एक विक्रेता तीन ते चार लाखाची विक्री करतो. वाचकांशी संवाद हेच त्याचे भांडवल आहे. असे त्यांचे संघटन आवश्यक आहे. किमान समान कार्यक्रम विक्रेते आणि प्रकाशकांनीही राबवायला हवा. एखादा अपवाद वगळला तर बालसाहित्यामध्ये कोणीही काम करत नाही. किशोरवयीन वाचकांसाठी पुस्तकेच उपलब्ध नाहीत. हीच मुले पुढे प्रौढावस्थेत गेल्यानंतर त्यांचे वाचनाचे लक्ष इतरत्र वळले तर त्यांना दोष देता येणार नाही. डिजिटल प्लॅटफॉर्मचा चांगला उपयोग करून घेतला गेला पाहिजे.’

विलास पोतदार यांनी सुचविले, ‘प्रकाशकांनी एकत्रित येऊन विक्रीची व्यवस्था करणे आवश्यक आहे. सध्या समोर ग्राहकच नाही, अशी स्थिती आहे. विक्रीअभावी पुस्तकांची गोदामे भरून गेली आहेत. हे चित्र सकारात्मक नाही. ते बदलण्यासाठी प्रकाशकांनी एकत्र आले पाहिजे.’

नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे विश्वस्त विनायक रानडे यांनी राबविलेल्या ‘ग्रंथ तुमच्या दारी’ या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची माहिती दिली. ‘वाचनाचे व्यसन लोकांना लावावे लागेल,’ असे सांगून ते म्हणाले, ‘प्रकाशकांनी पुस्तके प्रकाशित केली, विक्रेत्यांनी विकली तरी ती वाचनालयामध्ये जाऊन पडून राहतात. सुमारे ९८ टक्के पुस्तके वाचलीच जात नाहीत. त्यामुळे वाचनालयांचे आपण संग्रहालय करतो आहोत का, याचा विचार करायला हवा. ‘ग्रंथ तुमच्या दारी’ हा वेगळा उपक्रम छोट्याशा गोष्टीतून पुढे आला. मोबाइलच्या एसएमएसचा जमाना होता, तेव्हा वाढदिवसाचे मेसेज डॉक्टर्स, इंजिनीअर्स, वकील किंवा अन्य व्यावसायिकांना त्यांचे गट करून मी एसएमएसद्वारे सुरुवातीला कळविले. त्यामुळे त्या एकमेकांचा संपर्क होऊ शकला. त्यातून मला काय द्यायचे, असे या गटाच्या सदस्यांनी मला विचारले, तेव्हा एका पुस्तकाच्या किमतीएवढी देणगी द्या, असे मी त्यांना सुचविले. त्यातून सुरुवातीच्या दोन वर्षांत पाच लाख रुपयांची देणगी जमा झालेली पुस्तके लोकांना वाचाला दिली. पुस्तके विकली जातील, पण ती वाचली जातील का, याचा विचार करून मी या उपक्रमात वाढ केली. वाढदिवस एकसष्टी, पंच्याहत्तरी अशा कौटुंबिक कार्यक्रमांमधून लोकांना देणगी द्यायला सुचविल्यानंतर गेल्या अकरा वर्षांमध्ये दोन कोटी २५ लाख रुपयांच्या मूल्याची पुस्तके लोकांपर्यंत पोहोचली. अशा पुस्तकांच्या दोन हजार पेट्या लोकांपर्यंत पोहोचतात. ९०० प्रकाशकांची एक लाख पुस्तके त्यामध्ये आहेत. असे वेगळे उपाय योजले, तर पुस्तकांना वाचक मिळतील आणि पर्यायाने प्रकाशन व्यवसायापुढेही प्रश्न निर्माण होणार नाही.’
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/UZZFCI
Similar Posts
मातीच्या आड गेलेले लढवय्ये हेच स्फूर्तीचे झरे चिपळूण : ‘मातीच्या आड गेलेले लढवय्ये, हेच स्फूर्तीचे खरे झरे आहेत. लेखक त्यातील माती आणि वाळू बाजूला करतो आणि रत्न सादर करतो,’ अशा शब्दांत ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांनी ऐतिहासिक कादंबरीलेखनामागची आपली भूमिका स्पष्ट केली. ‘पानिपत’सह संभाजी, पांगिरा, झाडाझडती इत्यादी कादंबऱ्यांचा लेखनप्रवास चिपळुणात
डिजिटल पुस्तके म्हणजे प्रकाशनाच्या क्षेत्रातील संकट नसून संधी : अनिल मेहता चिपळूण : ‘नव्या माध्यमांच्या वापरातून आपले मन सुसंस्कृत करणे ही प्रत्येकाची गरज आहे. सुसंस्कृत मने तयार करण्यात पुस्तकांचा आणि पर्यायाने प्रकाशकांचा वाटा मोलाचा असतो. त्यामुळे नव्या युगातील डिजिटल पुस्तके म्हणजे प्रकाशनाच्या क्षेत्रातील संकट नसून संधी आहे,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ प्रकाशक अनिल मेहता यांनी २८ डिसेंबर २०१९ रोजी चिपळुणात व्यक्त केले
चिपळूणचे वैभवशाली वस्तुसंग्रहालय चिपळूणच्या तब्बल १५५ वर्षे जुन्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराने आपले वस्तुसंग्रहालय अलीकडेच खुले केले आहे. चिपळुणातील हे संग्रहालय कोकणाच्या सांस्कृतिक राजधानीचे वैभव ठरते आहे. भारतीय मातीतील दोन लाख वर्षांपूर्वीच्या मानवी वापरातील पुराश्मयुगीन हत्यारांपासून कोकणी वापरातील गेल्या दोन-पाचशे वर्षांतील
श्री क्षेत्र परशुराम : जयंतीनिमित्त आज ऑनलाइन दर्शन आज (२५ एप्रिल २०२०) परशुराम जयंती आहे. दर वर्षी या दिवसापासून चिपळूण (जि. रत्नागिरी) येथील श्री क्षेत्र परशुराम येथे तीन दिवसांचा उत्सव सुरू होतो. यंदा मात्र करोनाच्या संकटामुळे लागू असलेल्या संचारबंदीमुळे त्यावर निर्बंध आहेत. त्यामुळे देवस्थान ट्रस्टने आजच्या दिवसासाठी ऑनलाइन दर्शनाची सोय उपलब्ध केली आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language